साला माणूस पण एक विचित्र रासायन आहे. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर त्याला कुणाचीतरी सोबत ही लागतेच. जन्माला आल्यावर आई बाबा, खेळायला लागल्यावर भावंड, शाळेत जायला लागल्यावर गाडीतली इतर मुले, शाळेतील मित्र.
पण मित्र हे एक नाते जिथे जाऊ तिथे सोबत असते नव्हे असू तिथे नव्याने जुळते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चेहरा आणि व्यक्ती जरी बदलत असली तरी मित्रत्वाची भावना मात्र सारखीच असते.
बदलत जात असणाऱ्या या चेहर्यांत काही चेहरे मात्र कायम असतात काळाबरोबर न बदलणारे. कदाचित आपणच बदलू देत नसावेत या चेहर्यांना. अशा मैत्रीची नाती कदाचित कालातीत असतात.
आई बाबां नंतर जर आपल्याला साथ देणार आणि सोबत करणार निस्वार्थ नात कुठल असेल तर ते मैत्रीच. वयाच्या पहिल्या 25-30 वर्षांत घरापासून दूर रहाताना प्रत्येक पावलावर सांभाळून घेणारी ही मैत्री आपल्याला जगण्याच, लढण्याच आणि झगडत राहण्यात बळ देते.
पण कितीही नाही वाटत असले आणि आपण कितीही ताणून धरले तरी बदल हा काळाचा नियम आहे. नको वाटत असले तरी मित्रही दुरावतातच. हा नुसता विचार जरी दुखावणारा असला तरी ती वस्तुस्थिती मात्र आहे.
सगळ्यांना शेवटी आपली लढाई आहेच आणि आपापल्या जबाबदार्याही. आयुष्याच्या सुरुवातीला सोबत असणारी ही नाती आणि हे मित्र ज्यांच्या मनात दूरावण्याचा साधा विचारही नसतो ती क्षणार्धात दुर जातात. आणि सोबतीला असते ती फक्त त्यांच्या असण्याची भावना.
- सौरभ देशपांडे
